कॉम्रेड कुमार शिराळकर आदरांजली सभा

प्रख्यात मार्क्सवादी विचारवंत, शहादा चळवळीचे नेते, शेतमजुरांचे नेते, पुणे कलेक्टिवचे मार्गदर्शक व हितचिंतक कॉम्रेड कुमार शिराळकर यांचे नाशिक येथे २ ऑक्टोबर २०२२ च्या सायंकाळी निधन झाले.

कॉ. कुमार शिराळकर महाराष्ट्रात सत्तरीच्या दशकात शहादा येथील श्रमिक संघटना, ‘मागोवा’ गटाचे एक प्रमुख मार्गदर्शक आणि कृतिशील कार्यकर्ते होते. इंजिनिअरिंगचा अभ्यास पूर्ण करून त्यांनी काही काळ मुबंई मध्ये नोकरी केली. त्यानंतर सोमनाथ च्या श्रमिक विद्यापीठात बाबा आमटे यांच्या सोबत त्यांनी काही काळ कार्य केले, या काळात शहादा [धुळे] येथे ‘श्रमिक संघटने’च्या माध्यमातून उभ्या होत असलेल्या आदिवासी शेतकरी-शेतमजुरांच्या चळवळीत कॉ. कुमार शिराळकरांनी स्वतःला झोकून दिले. त्यांनी ज्या वर्ग समूहासाठी काम केले त्यांच्याशी एकरूप होऊन गेले ते इतके की मृत्यूनंतर त्यांचा अंत्यसंस्कार सुद्धा आदिवासी परंपरेने पार पडला.

सत्तरीच्या दशकांत गाजलेले “उठ वेड्या तोड बेड्या”, “नवे जग नवी तगमग” या पुस्तकांचे तसेच डाव्या विचाराचे प्रबोधन करणाऱ्या अनेक पुस्तिकांचे त्यांनी लेखन केले. प्रचलित सामाजिक-आर्थिक व्यवस्थेचे मार्क्सवादी दृष्टिकोनातून परखड विश्लेषण करणारे आणि क्रांतिकारी राजकीय वैचारिक मांडणी करणारे शेकडो लेख त्यांनी लिहिले. मार्क्सवादी दृष्टीतून आंबडेकरवादाचा सर्जनशील अर्थ लावीत जाती प्रश्ना बद्दल स्पष्ट कृतिशील भूमिका ते घेत असत. यामुळे समाजातील सर्वच थरातील हजारो युवकांचे ते प्रेरणा स्थान व आदर्श बनले.

कॉ. कुमार शिराळकर यांच्या निधनाने डाव्या पुरोगामी चळवळीने एक खराखुरा कृतिशील कम्युनिस्ट विचारवंत गमावला आहे. त्यांच्या कार्याला आणि स्मृतीला अभिवादन करण्यासाठी, बुधवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२२ रोजी, संध्याकाळी ५ वाजता, लोकमान्य सभागृह, केसरीवाडा, केळकर रोड, नारायण पेठ, पुणे येथे कॉ. कुमार यांचे साथी, मित्र परिवार व कुटुंबीयांच्या वतीने त्यांना आदरांजली देण्यात येणार आहे.

आपण अवश्य उपस्थित राहावे ही नम्र विनंती.

टिम पुणे कलेक्टिव्ह

व्हिडीओ सौजन्य – CPIM, महाराष्ट्र