१९८९ सालची गोष्ट आहे. दर रविवारी टीव्हीवर राही मासून रझा लिखित बी. आर. चोप्रांचं महाभारत प्रसृत होत असे. त्यानंतर तासाभराने श्याम बेनेगल यांचं भारत की खोज. या दोन महामालिकांच्या मधल्या एका तासात येऊन गेली होती, एक तासांच्या तेरा भागांची विज्ञानचित्रपट मालिका – भारत की छाप. या दोन महामालिकांच्यामध्ये सापडल्याने तिची फारशी दखल घेतली गेली नाही. पण फ्रान्सचा ज्यूल्स व्हर्न पुरस्कार मिळवणारी छंदिता मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेली ही चित्रपट मालिका एक आगळीवेगळी मालिका होती.
भारताबद्दलचे दोन टोकाचे समज आहेत. एक असे मानतो की अध्यात्म हाच भारताचा आत्मा आहे आणि इथली विज्ञानपरंपरा क्षीण आहे. दुसरा मानतो की आपल्याकडचे विज्ञान आजच्या विज्ञानापेक्षाही प्रगत होतं! या मालिकेचे वैशिष्ट्य हे की ती असं मानते की हे दोन्ही समज चुकीचे आहेत व आपल्याकडे जे विज्ञान-तंत्रज्ञान खरोखरच होते ते इतर देशांच्या तोडीस तोड होते. ही चित्रपटमालिका पार पाषाणयुगापासून ते स्वातंत्र्योत्तर काळापर्यंतच्या भारतातील विज्ञानाचा, त्याच्या विकासाचा – भारत की छापचा – वास्तववादी मागोवा घेते.
चित्रपट मालिकेचे दुसरे वैशिष्ट्य आहे तिच्या रचनेत. मालिकेत पाच वार्ताहर पात्रें(अमृता, शहनाझ, रंजन, रामनाथन, रघू) आहेत व दोन अँकर पात्रं (मैत्रेयी व निस्सीम) आहेत. निरनिराळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन ही वार्ताहर मंडळी वार्तांकन करतात, मुलाखती घेतात, गाणीही म्हणतात! व नंतर त्यांची आणि अँकर पात्रांची चर्चा होते ज्यातून दुवे जोडले जातात. सज्जड अभ्यास, प्रत्यक्ष स्थलचित्रण आणि नाट्य-गेय रूपांतरं यातून सारे कथन होते.
बऱ्याचदा विज्ञान व विज्ञानाच्या इतिहासाची मांडणी ही एतद्देशीय सामाजिक भवतालापासून तोडून केवळ आधुनिक विज्ञानाशी जोडून केली जाते. या मालिकेचे तिसरे वैशिष्ट्य हे की ती विज्ञान हे विज्ञानाच्या सामाजिक परिवेशात वाढते असे मानते. त्यामुळे ती सतत त्या त्या काळाच्या सामाजिक परिवेशाचे भान ठेवते व त्या विज्ञानाचा विकास त्या परिवेशाशी जोडून मांडते.
अर्थातच या मालिकेला ३५ वर्षं होऊन गेली आहेत, त्यमुळे आजच्या डिजिटल चित्रणाची गुणवत्ता किंवा चटपटीतपणा या मालिकेत नाही. आपण ३५ वर्षांपूर्वीची मलिका पाहत आहोत, हे ध्यानात घेऊन, थोडा वेळ देऊन तिच्याशी समरस होऊन ती पहिलीत तर ती तुम्हाला खूप काही देऊन जाईल हे नक्की.
——–
Bharat Ki Chhap (Identity of India)” is a 13-episode Indian TV science documentary series that chronicles the history of science and technology in India from prehistoric times until the present. The series was directed by filmmaker Chandita Mukherjee and introduced by Professor Yash Pal.
It presents alternative viewpoints on the subject of science as pioneered in India, offering a pragmatic contrast with Western scientific endeavours. The series garnered support from the People’s Science Movement.
A companion book, titled “Bhārat Ki Chhāp: A Companion Book to the Film Series,” was later published by Comet Project, authored by Chayanika Shah, Suhas Paranjape, and Swatija Manorama.