एक उपोषण सहवेदनेचे!

गाझापट्टीतील लोकांप्रती सहानुभूती व्यक्त करण्यासाठी आणि तेथील मानवसंहार आणि उपासमारीने घेतले जाणारे भूकबळी थांबवा या मागणीसाठी जगभर सुरू असलेल्या उपोषणाला समर्थन आणि सहभाग देण्यासाठी –
लाक्षणिक उपोषण
दिनांक 3 ऑगस्ट 2025
सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळात
संभाजी बागेसमोरील फुटपाथवर

आयोजक
स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय (NAPM), पुणे कलेक्टिव्ह, DYFI, SFI, नवसमाजवादी पर्याय, लोकशाही उत्सव समिती, लोकस्वतंत्रता संघटना (PUCL) व अन्य समविचारी संघटना व व्यक्ती.

———————————————————————————————–

पॅलेस्टाईनमधील मानवसंहार थांबवा! तिथे तत्काळ अन्नपुरवठा सुरू करा! पॅलेस्टाईनला मुक्त करा! यासह
भारत सरकारने पॅलेस्टाईनच्या बाजूने ठाम भूमिका घ्यावी – पुरोगामी संघटनांची मागणी

पॅलेस्टाईनमध्ये गेली तब्बल पावणे दोन वर्षे आणि त्याही आधीपासून इस्रायलकडून सुरू असलेल्या अत्याचाराची आता परमावधी झाली आहे. तेथील कोवळी बालके, स्त्रिया, पुरुष रोज बॉम्ब वर्षावात मृत्युमुखी पडत आहेत. जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. आता तर इस्रायलने पॅलेस्टाईनचे अन्न आणि औषधे या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही रोखून संपूर्ण पॅलेस्टाईनला भुकेने मारण्याचा डाव रचला आहे. त्या विरोधात संपूर्ण जगभरातून जन आक्रोश उमटत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 27 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान जगभरातील संवेदनशील नागरिकांनी उपोषण करून पॅलेस्टाईन मधील नरसंहार थांबा, तेथे अन्नपुरवठा तत्काळ सुरू करा आणि पॅलेस्टाईनला इस्रायलच्या पंजातून मुक्त करा अशी मागणी केली. या मागणीला समर्थन म्हणून भारतातही देशभर विविध ठिकाणी उपोषण करण्यात आले. पुण्यातही पुरोगामी संघटनांच्या वतीने काल दिनांक 3 ऑगस्ट रोजी संभाजी बागेसमोर दिवसभराचे उपोषण करण्यात आले आणि त्यावेळी पॅलेस्टाईनला पाठिंबा देत या संपूर्ण मुद्द्याकडे नागरिकांचे लक्ष देण्यात आले. पॅलेस्टाईनसाठी उभे राहणे म्हणजे मानवतेच्या मुक्तीच्या प्रयत्नांना दिलेली साथ आहे आणि जगात कुठेही अन्याय झाला तरी आम्ही त्याच्या विरोधात उभे राहू असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. पॅलेस्टाईनच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याची आपली पूर्वीची भूमिका भारत सरकारने निभावावी अशी आग्रही मागणी याप्रसंगी करण्यात आली.

दिवसभर चाललेल्या या लाक्षणिक उपोषणात या विषयाचे अभ्यासक प्रा. परिमल माया सुधाकर, प्रा. श्रुती तांबे, जन आरोग्य कार्यकर्ते डॉ अनंत फडके, बाल हक्क कार्यकर्ते अच्युत बोरगावकर, सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन आणि मिलिंद चंपानेरकर यांनी या प्रश्नाची विविध अंगांनी मांडणी केली.

‘पॅलेस्टाईन – इतिहास आणि सद्यस्थिती ‘ मांडताना प्रा. डॉ. परिमल म्हणाले की मुळात इस्रायलची निर्मितीच पॅलेस्टाईनची भूमी परस्पर यहुदींना देण्यातून झाली होती. दुसऱ्याच्या भूमीवर राज्य करणे योग्य नाही असे म्हणत महात्मा गांधींनी याला त्यावेळीच विरोध केला होता. ज्यूंची लोकसंख्या नगण्य होती म्हणून त्यावेळी पॅलेस्टिनीनी, फाळणी करू नका, सर्वजण एकत्र राहू अशी भूमिका घेतली होती. परंतु इस्रायलने आडमुठेपणा करून स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली आणि त्यानंतर, घरातील एक खोली दिली तर इस्रायल सारे घरच बळकाऊ पाहत आहे आणि ते देखील पॅलेस्टाईनला पूर्णपणे नष्ट करून! गेली 75 वर्षे हे चालू आहे. आता तर त्याने क्रौर्याची हद्द गाठली आहे. पॅलेस्टाईनची सर्व जमीन इस्रायलने बळकावली आहे आणि आता उरली सुरली गाझा पट्टीही बळकाऊ बघत आहे. आज आपल्या देशातच पॅलेस्टाईन निर्वासित झाला आहे आणि पूर्णपणे इस्रायलच्या नियंत्रणात आहे.
भारताने पॅलेस्टाईनच्या फाळणीला सुरुवातीपासून विरोध केला होता. त्यानंतरही पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याच्या मागणीला भारताने नेहमीच पाठिंबा दिला. यासर अराफत यांच्या नेतृत्वाखाली तिथे चाललेल्या शांततामय आंदोलनाला साथ दिली. हमासचा जन्म इस्रायलच्या या अन्यायामुळे आणि अतिक्रमणामुळे झालेला आहे आणि आता तर इस्रायल सीरिया, जॉर्डन, लेबनॉनसह ग्रेटर इस्रायलचे स्वप्न पाहत आहे! याला वेसण घालायला हवी. भारताने आपली ऐतिहासिक भूमिका आजही पार पडायला हवी असे प्रतिपादन प्रा.डॉ. परिमल यांनी केले.

प्रा. श्रुती तांबे यांनी इस्रायलद्वारे पॅलेस्टिनी महिला, मुलींवर केल्या जाणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना सांगितल्या. अन्न मागणाऱ्या लोकांवर गंमत म्हणून बेछूट गोळीबार केला जातो. निर्वासित छावण्यांवर बॉम्ब वर्षाव केला जातो. मागील दोन महिन्यांमध्ये पॅलेस्टाईनमधली 18000 मुले दगावली आणि आता तर उपासमारीमुळे मृत्युमुखी पडत आहेत ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली.

बाल सुरक्षा आणि बाल हक्कांवर काम करणाऱ्या अच्युत बोरगावकर यांनी इस्रायलच्या हल्ल्याचा मुलांवरील होणारा परिणाम मांडला. हृदय पिळवटून टाकणाऱ्या अनेक घटनांचा दाखला त्यांनी दिला आणि कुठल्याही परिस्थितीत बालकांच्या हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे अशी मागणी केली.

डॉ अनंत फडके यांनी पॅलेस्टाईनमधील वैद्यकीय स्थितीची वस्तुस्थिती मांडली. हॉस्पिटल्स उध्वस्त झाली आहेत, औषधांचा पुरवठा नाही, बाहेरील मदत मिळू दिली जात नाही अशा स्थितीत पॅलेस्टाईनच्या या जीवन मरणाच्या संघर्षात भारत सरकारने आपली मूळ भूमिका वठवायला हवी असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.

मिलिंद चंपानेरकर यांनीही, भारत सरकारने सुरुवातीपासून याबाबत घेतलेली आणि बजावलेली भूमिका आणि भारताच्या नेतृत्वाखाली अलिप्तता परिषदेने एकजुटीने पॅलेस्टाईनला दिलेला पाठिंबा या पार्श्वभूमीवर आत्ताच्या स्थितीत तर भारताने ठामपणे पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभे राहिलेच पाहिजे अशी आग्रही मागणी केली.

गांधीवादी कार्यकर्ते अन्वर राजन यांनीही गांधीजींनी त्यावेळी पॅलेस्टाईनच्या भूमीवर इस्रायल वसवण्यास केलेला विरोध किती योग्य होता हे सांगत पॅलेस्टाईनच्या मुक्तीची मागणी केली.

सामाजिक कार्यकर्ते मेधा थत्ते, शारदा वाडेकर, विनया देशपांडे, मेधा सामंत, अभय शुक्ला, विनय र र, सीमा कुलकर्णी, शैलजा आरळकर, महारुद्र डाके, गणेश मेरगू, दत्ता पाकिरे त्याचबरोबर साहित्यिक गणेश विसपुते, काँग्रेसचे नेते मोहन जोशी आणि अन्य वक्त्यांनी पॅलेस्टाईन मुक्तीच्या मागणीला आपले समर्थन व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या संयोजकांच्या वतीने बोलताना किरण मोघे म्हणाल्या की आज देशादेशातले लोक त्यांच्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारताहेत. इस्रायलमध्येही नेत्यानाहूच्या विरोधात सामान्य माणसे उभी आहेत. अशावेळी आपण पॅलेस्टाईनसोबत उभे राहणे म्हणजे मानवतेवरचा आणि लोकशाहीवरचा विश्वास दृढ करणेच आहे.

सुनीती सु र यांनी -‘अन्याय घडो शेजारी, की दुनियेच्या बाजारी,धावून तिथेही जाऊ,स्वातंत्र्य मंत्र हा गाऊ। – या पुरोगामी चळवळीच्या भूमिकेसह ‘ जय जगत ‘ चे आवाहन केले.
इब्राहिम खान, प्रसाद बागवे, प्राजक्ता, स्मिता हेमलता, ज्ञानेश्वर मोटे, मालविका आणि अन्य कार्यकर्त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समिती, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय (NAPM), पुणे कलेक्टिव्ह, DYDI, SFI, नवसमाजवादी पर्याय, लोकशाही उत्सव समिती, PUCL व अन्य समविचारी संघटना आणि व्यक्तींच्या पुढाकाराने झालेल्या या ‘ एक उपोषण सहवेदनेचे – गाझा साठी ‘ या कार्यक्रमात पुढील मागण्या करण्यात आल्या


  • उपासमारीचा शस्त्र म्हणून वापर करणे बंद करा
  • इस्रायलच्या सत्ताधाऱ्यांनी पॅलेस्टाईनच्या सामान्य नागरिकांची नाकेबंदी त्वरित उठवावी.
  • जीवनावश्यक वस्तूंची रसद तत्काळ सुरू करा
  • मानव संहार थांबवा
  • युद्धविराम करा
  • पॅलेस्टाईन मुक्त करा
  • भारत सरकारने पूर्वीप्रमाणे पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका घेतली पाहिजे, पॅलेस्टाईनच्या शांतता न्याय आणि स्वातंत्र्याला पाठिंबा दिला पाहिजे त्या दृष्टीने इस्रायल बरोबर होणारे सर्व प्रकारचे लष्करी सहकार्य थांबवले पाहिजे.