कोविड आणि वैज्ञानिक दृष्टिकोन!

पुणे कलेक्टिव्ह आणि ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमात आम्ही आपणा सर्वांना आमंत्रित करत आहोत. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक २१ ऑगस्ट २०२१ रोजी, संध्याकाळी ५.४५ वाजता आयोजित केला आहे.

या निमित्ताने आम्ही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मरणार्थ तसेच जनमानसात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणाऱ्या सर्व व्यक्ती, चळवळी तसेच संघटनांच्या कार्याला सलाम करतो.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगिकार व प्रसार करणे हे भारतीय नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाचे घटनादत्त कर्तव्य आहे. त्यामुळे छद्मविज्ञानाला, विशेषतः शासनपुरस्कृत छद्मविज्ञानाला विरोध करणे हे देखील भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. केंद्रसरकार आणि काही राज्यसरकारे कोरोनाबद्दलच्या खोट्या आणि फसव्या माहितीला, आकडेवारीला प्रोत्साहन देत आहेत, उचलून धरत आहेत आणि हे करणाऱ्यांची जाहिरातदेखील करत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार वाढला आहे. त्याचबरोबर वैज्ञानिक धोरणे आखणे व त्यानुसार प्रतिसाद ठरवणे याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत आम्ही चिंता व्यक्त करीत आहोत. वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय कोरोनाचा सामना अशक्य आहे. खाजगी आरोग्य सेवांमध्ये कॉर्पोरेट नफेखोरीला वाव ठेवणारी धोरणे केंद्रशासनाबरोबरच अनेक राज्यांनी अवलंबलेली आहेत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यसेवांकडे दुर्लक्ष होऊन त्या कमकुवत होत आहेत. ही धोरणे बदलणे आणि प्रभावी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सर्वांसाठी उपलब्ध कऱणे हे कोरोनावर मात करण्यासाठी अत्यावश्यक आहे. सर्वांसाठी मोफत आणि गतिमान लसीकरणाचे राष्ट्रीय धोरण ठरवून त्याची कार्यक्षम अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. पण हे न करता सत्ताधारी, छद्मविज्ञानाचा फोलपणा उघड करणाऱ्या सामान्य नागरिकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना तसेच जमिनीवरील वास्तव निर्भीडपणे मांडणाऱ्या स्वतंत्र माध्यमांना पद्धतशीरपणे लक्ष्य करून, यंत्रणेचा दुरूपयोग करून, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.

या सर्व पार्श्वभुमीवर आम्ही तुम्हाला 'कोविड आणि वैज्ञानिक दृष्टिकोन!' या चर्चासत्रात आमंत्रित करत आहोत. यामध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत, परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते तसेच मनोविकारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर; तसेच लेखक, अभियंता, पत्रकार आणि विज्ञान कार्यकर्ते, न्यूजक्लिकचे संस्थापक आणि मुख्य संपादक, प्रबीर पुरकायस्थ आणि मायक्रोबायोलॉजिस्ट, व्हायरलॉजिस्ट आणि फेलो रॉयल सायंटिस्ट, गगनदीप कांग.

या कार्यक्रमात मणिपूरमधील पत्रकार किशोरचंद्र वांगखेम आणि कार्यकर्ते एरेन्ड्रो लेइकोम्बम यांचा AIPSN आणि पुणे कलेक्टिव्ह तर्फे आपण सत्कार करणार आहोत. “शेण आणि गोमुत्राने कोविड-19 बरा होत नाही” अशा आशयाची फेसबुक पोस्ट लिहिल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर त्या दोघांवर रा.सु.का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांनीही छद्मविज्ञानालाला केलेला विरोध आणि त्यांची निर्भीड व धैर्यवान भूमिका याबद्दल हा सत्कार होत आहे.

राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवसाच्या निमित्ताने सर्व नागरिक, लोकसंघटना आणि शैक्षणिक संस्थांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे. तसेच, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या निर्घृण खूनाच्या विरोधात आपला आवाज उठवावा असे आम्ही आवाहन करतो.

हा कार्यक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजीत असणार आहे.
दिनांक २१ ऑगस्ट २०२१ रोजी संध्या. ५.४५ वाजता तुम्ही पुढीलपैकी कोणत्याही लिंकद्वारे लाईव्ह सेशनमध्ये सहभागी होऊ शकता.



Facebook: https://facebook.com/punecollective
Youtube: https://www.youtube.com/c/punecollective
Twitter: https://twitter.com/punecollective
Instagram : https://instagram.com/punecollective
Telegram : https://t.me/punecollective
Mailing List : http://eepurl.com/ha9mXT
Website: https://punecollective.in

#पुणेकलेक्टिव्ह #PuneCollective #AIPSN

#NSTD #NationalScientificTemperDay