हाथरस येथे चार उच्चजातीय पुरूषांनी एका १९ वर्षीय दलित मुलीवर बलात्कार करून तिच्यावर निर्घृण शारीरिक अत्याचार केले परिणामी तिचा मृत्यू झाला. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या पाशवी कृत्याचा पुणे कलेक्टिव्ह तीव्र निषेध करत आहे. मृत्यूनंतरही तिला ती मानवी प्रतिष्ठेपासून वंचित ठेवण्यात आलं. जातीवाद्यांनी तिचा दोन वेळा जीव घेतला: प्रथम तिचा खून करून आणि नंतर रात्रीच्या अंधारात पोलिसी बळाचा वापर करत तिच्या प्रेताचे दहन करून.
या निषेधाचा भाग म्हणूनच पुणे कलेक्टिव्ह पुढील कार्यक्रम, शनिवार, ३ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करत आहे.
जातीवर्चस्व-पितृसत्ताकता-राज्यसंस्था : विकृत युती
मोदी-योगी राजवटीत महिला आणि दलितांवरील, विशेषतः दलित महिलांवरील, पाशवी लैंगिक अत्याचारात भयानक प्रमाणात वाढ झाली आहे. विरोधात उठणाऱ्या आवाजाना दडपणे, गुन्हे नोंदवून देखील न घेणे, गुन्हेगारांनाच संरक्षण देणे, त्यांना निर्लज्जपणे उघड उघड सत्तेचा गैर वापर करत पाठीशी घालणे अशा गोष्टी सर्रास दिसत आहेत. उत्तर प्रदेशातील ही घटना म्हणजे जात्याधारीत, पितृसत्ताक, सरंजामी हिंदुराष्ट्राचा साचा म्हणावा लागेल. खैरलांजी असो, कथुआ असो की हाथरस या घटना आता अपवादात्मक राहिलेल्या नाहीत.
अशा परिस्थितीत हिंसाचारचं सामान्यीकरण करणारी संरचना कशी तयार होते, ती कशी काम करते, तिचा व्यवस्थेशी परस्पर संबंध काय , हे समजून घेणे आवश्यक आहेच. त्याचबरोबर, या साऱ्या अमानुषतेवर मात करत एक चांगला आणि न्याय्य समाज कसा घडवता येईल, यावरही बोलणे आम्हाला आवश्यक वाटते.
या पार्श्वभूमीवर यावेळी आपल्याशी संवाद साधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील वकील व सामाजिक कार्यकर्त्या दिशा वाडेकर; स्त्रीवादी इतिहासकार, लेखिका व भाषांतरकार व्ही. गीता आणि महिला अधिकार कार्यकर्त्या व जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा जगमती संगवान सहभागी होत आहेत.