सुधीर बेडेकर आदरांजली सभा

प्रख्यात मार्क्सवादी विचारवंत आणि लेखक सुधीर बेडेकर यांचे पुण्यामध्ये २५ मार्च २०२२ च्या पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७६ वर्षांचे होते. पुण्यातील ‘समाज विज्ञान अकादमी’चे ते विश्वस्त अध्यक्ष होते.

एक नवी वाट चोखाळणारे आणि अधिक सांस्कृतिक व सर्जनशील-मानुष अशा पद्धतीने मार्क्सवादाची मांडणी करणारे विचारवंत म्हणून सुधीर बेडेकर सत्तरीच्या दशकात महाराष्ट्राला परिचित झाले.

१९७० च्या दशकात जगभरात आणि भारतात अस्वस्थ व बंडखोर युवकांचे उठाव होत असताना महाराष्ट्रात सत्तरीच्या दशकामधील ‘मागोवा’ गटाचे एक प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते पुढे आले. याच काळात शहादा [धुळे] येथे ‘श्रमिक संघटने’च्या माध्यमातून उभ्या झालेल्या आदिवासी शेतकरी-शेतमजुरांच्या चळवळीशी ‘मागोवा’ व सुधीर बेडेकर हे अत्यंत क्रियाशील व जैव रीतीने जोडले गेले. ‘हजार हातांचा ऑक्टोपस’, ‘विज्ञान कला आणि क्रांती’ या पुस्तकांचे तसेच डाव्या विचाराचे प्रबोधन करणाऱ्या अनेक पुस्तिकांचे त्यांनी लेखन केले. ‘मागोवा प्रकाशना’च्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण पुस्तके व पुस्तिका त्यांनी प्रकाशित केल्या.

प्रचलित सामाजिक-आर्थिक व्यवस्थेचे मार्क्सवादी दृष्टिकोनातून परखड विश्लेषण करणारे आणि क्रांतीकारी राजकीय वैचारिक मांडणी करणारे शेकडो लेख त्यांनी लिहिले. सत्तरीच्या दशकामध्ये साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळी, तसेच युक्रांद-दलित पॅंथर पासून ते विविध एम एल गटांसह डावे पक्ष आणि डाव्या चळवळी यातील सर्व संघटना आणि कार्यकर्त्यांना एका वैचारिक-सांस्कृतिक धाग्यामध्ये गुंफण्याचे प्रयत्न त्यांनी सातत्याने केले. महाराष्ट्रातील हजारो तरुणांना ते प्रेरक आणि मार्गदर्शक ठरले. महाराष्ट्रातील ‘लोकविज्ञान चळवळ’ तसेच ‘अखिल भारतीय जनविज्ञान आंदोलन’ यांना त्यांनी नेहमीच मार्गदर्शन आणि सहकार्य केले. आधी ‘मागोवा’ आणि नंतर ‘समाज विज्ञान अकादमी’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध डाव्या-पुरोगामी संस्था-संघटनांच्या कार्यकर्त्यांना मदत आणि वैचारिक साहित्य उपलब्ध करून देणे, तसेच त्यांची शिबिरे आणि अभ्यास वर्ग घेणे हे अतिशय मोलाचे काम त्यांनी केले.

सुधीर बेडेकर यांच्या निधनाने डाव्या पुरोगामी चळवळीने एक सर्जनशील विचारवंत गमावला. त्यांच्या कार्याला आणि स्मृतीला अभिवादन करण्यासाठी ही आदरांजली सभा.